फुलात न्हाली पहाट ओली
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलावर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणा कुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळया रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातून बोलविले
भरात येउन नग्न शिरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरीत हळू तयाला सांगितले
तिचिया पोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात
राजस एक पाखरु भिरभिरते
_ ना.धो.महानोर
No comments:
Post a Comment